Whose blessing to the illegal lender? : सहकार विभागाची मोर्शीत धडक कारवाई, दस्तऐवज जप्त
Amravati कमी भांडवलात अधिक नफा मिळत असल्याने मोर्शी शहर आणि तालुक्यात अवैध सावकारांचा सुळसुळाट वाढला आहे. सहायक निबंधक सहकारी संस्था, मोर्शी यांच्याकडे याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) दोन ठिकाणी धाडी टाकून महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले. यामुळे अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
मोर्शीतील या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यातीलच सावकारीचा प्रश्न पुढे आला आहे. या गोरखधंद्याला कुणाच्या आशीर्वाद आहेत असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. तक्रारींची दखल घेत जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी तत्काळ दोन पथकांची नेमणूक केली. या पथकांनी मोर्शीतील दोन सावकारांच्या निवासस्थानी छापे टाकून झडती घेतली.
Gram Panchayat : ग्राम पंचायत संगणक चालकांवर उपासमारीची वेळ !
पहिल्या धाड पथकाचे नेतृत्व सहायक निबंधक राजेश भुयार यांनी केले. त्यांच्यासोबत अविनाश महल्ले, सुधीर मानकर, श्रीमती स्विटी गवई, नंदकिशोर राणा, प्रियंका कुकडे, पंच मोहीत अढाऊ आणि भूषण डहाणे यांचा समावेश होता. या पथकाने सुधीर महादेवराव पाचारे (रा. दुर्गानगर, मोर्शी) यांच्या घरावर सकाळी ११:१५ वाजता छापा टाकला. झडतीदरम्यान धनादेश बुक जप्त करण्यात आले. ही कारवाई दुपारी १:०० वाजता पूर्ण झाली.
दुसऱ्या पथकाचे नेतृत्व सहायक निबंधक आशीष चर्जन (वरुड) यांनी केले. त्यांच्या पथकात अमित नालट, किशोर भुस्कडे, श्रीमती सुश्मिता सुपले, पोलिस सुधीर दहीकर, पोलिस प्रीती शिंदे, अब्दुल सलीम, पंच भैय्या चोंधे आणि शैलेश जाणे यांचा समावेश होता. या पथकाने सुनिल रामकृष्ण निंभोरकर (रा. पारडी, ता. मोर्शी) यांच्या घरी सकाळी ११:१५ वाजता छापा टाकून झडती घेतली.
Shivdeep Lande : गुन्हेगारांना धडकी भरवली; आता कुणाला भरवणार?
या ठिकाणी एकूण ३६ कोरे स्वाक्षरीचे धनादेश, १०० रुपयांचे ६ कोरे स्टॅम्पपेपर, इसारपावती व नोंद वही जप्त करण्यात आली. ही कारवाई दुपारी १:५० वाजता पूर्ण झाली. जप्त केलेले दस्तऐवज पुढील चौकशीसाठी सहायक निबंधक राजेश भुयार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. यापूर्वीदेखील अप्पर वर्धा कॉर्टर परिसरात धाड टाकून दोन महिला सावकारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.