Congress leadership of Maharashtra to Vidarbha : वडेट्टीवारांचा दावा खरा, पण पद बदललं!
Nagpur सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis नागपूरचे असल्यामुळे सरकारची सूत्रं विदर्भाकडे आहेत, असं म्हटलं जातं. आता काँग्रेसनेही प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ नेता विदर्भातूनच निवडला आहे. हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे आणि विजय वडेट्टीवार चंद्रपूरचे आहेत. त्यामुळे काँग्रेसचीही महाराष्ट्रातील सूत्रं विदर्भाकडेच आहेत, असं म्हटलं जात आहे.
वडेट्टीवार यांची विधीमंडळ नेता म्हणून निवड झाल्यावर त्यांनी केलेल्या दाव्याची चर्चा जास्त होत आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेकांनी माझ्या नावाची हायकमांडकडे शिफारस केली आहे. असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी केला होता. त्यांच्या दाव्यानंतर काही तासांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा प्रश्न सुटला. महासचिवांनी नियुक्ती पत्र जारी केलं. पण त्यात वडेट्टीवार यांचं नाव नव्हतं. तर हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली होती.
वडेट्टीवार यांनी केलेला दावा बऱ्याच अंशी खरा निघाला. मात्र त्यांचं पद बदललं होतं. त्यांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वडेट्टीवार यांनी अडिच वर्षे महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधीपक्षनेतेपद सांभाळले आहे. त्यांना सभागृहात पक्षाचं नेतृत्व करण्याचा उत्तम अनुभव आहे. त्यामुळे सभागृहाबाहेर हर्षवर्धन सपकाळ आणि सभागृहात वडेट्टीवार काँग्रेसचे नेतृत्व करतील.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी अनेक विधानं केली. त्यात अप्रत्यक्षरित्या नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला. पटोले यांच्यावर चौफेर टीका होत होती. अशात प्रदेशाध्यक्षपदासाठी आमदार अमित देशमुख, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांची नावे चर्चेत होती. यात विशेषतः दावे-प्रतिदावे दडलेले होते.
Maharashtra Congress : हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ!
वडेट्टीवार यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे, हे त्यांच्या विधानांमधून स्पष्ट जाणवत होतं. पण प्रत्यक्ष मात्र काँग्रेसने त्यांना वेगळी जबाबदारी दिली. त्यामुळे विरोधीपक्षनेता होण्याची इच्छा अपुरी राहिली आहे. पण ‘हेही नसे थोडके’ असं मानून त्यांना पुढे जावं लागणार आहे.