Breaking

Vijay Wadettiwar : पुण्याचे पोलीस आयुक्त चॉकलेट खात बसलेत काय?

 

Police Commissioner of Pune does the recovery work only : विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल; गृह खात्याचा धाक उरला नाही

Nagpur पुण्यातील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेतील आरोपींना राजकीय संरक्षण मिळत आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) हे वसुली अधिकारी झाले आहेत. असा हल्लाबोल विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त चॉकलेट खात बसले आहेत काय, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी हल्ला चढविला आहे.

पुण्याहून फलटणला जात असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षी तरुणीवर बलात्काराची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी राज्यात व प्रामुख्याने पुण्यात महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचारावर राज्य सरकारला घेरले आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक नगरी म्हणून बिरुद लावले जात होते. परंतु आज पुणे (Pune) हे महिलांच्या अत्याचारामध्ये (Crime against woman) पहिल्या क्रमांकावर आहे.

Vijay Wadettiwar : फडणवीस-शिंदेंना वडेट्टीवार म्हणाले, ‘भांडा सौख्य भरे..’

राज्यात दिवसेंदिवस महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ होत आहे. या अत्याचारामध्ये सहभागी असलेल्या लोकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक असल्याचे दुर्दैवाने समोर येत आहे. पुण्यातील घटनेत सुद्धा आरोपी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्या विधिमंडळात उचलला जाईल, असं वडेट्टीवार म्हणाले.

राज्याचे गृह खाते झोपा काढण्याचे काम करीत आहे. दुर्दैवाने गुन्हेगारांवर पोलिसांचा कोणताही वचक राहिलेला नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना महिलांच्या सुरक्षिततेसाठी शक्ती कायदा तयार केला होता. या कायद्याची अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. परंतु राज्य सरकारचे लक्ष महिलांच्या सुरक्षेवर नसून कार्यकर्त्यांना संरक्षण कसे द्यायचे, यावर असल्याचे आरोप त्यांनी केला.

Vijay Wadettiwar : आता संजीव कुमार राज्यसभेवर जातील की केंद्रात नियुक्तीवर ?

पुण्यातील पोलीस आयुक्त वसुली करण्यासाठी बसविला आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. गृहमंत्र्यांनी या घटनांची त्वरित दखल घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था नसल्याची स्थिती आहे. शिवशाही बसमध्ये सुरक्षा व्यवस्था नव्हती काय? सुरक्षा व्यवस्था होती तर ही व्यवस्था काय करीत होती? पोलीस आयुक्त चॉकलेट खात बसला आहे काय? केवळ वसुली करण्यासाठी या अधिकाऱ्यांना तेथे बसविले आहे काय, असा सवालही त्यांनी केला. या घटनेची जबाबदारी पुणे पोलीस व राज्य सरकारने स्वीकारण्याची आवश्यकता असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.