Subject committee allotment on 24th February : विशेष सभेमध्ये समित्यांवर घेणार सदस्य
Gondia जिल्हा परिषद विषय समिती सभापतिपदाची निवडणूक १० फेब्रुवारी घेण्यात आली. यानंतर आता सभापतींना खाते वाटप करण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी जि.प. अध्यक्षांनी विशेष सभा बोलाविली आहे. या सभेत अर्थ व बांधकाम, शिक्षण व आरोग्य आणि कृषी पशुसंवर्धन या तीन सभापतिपदांचे वाटप केले जाणार आहे.
सभापती निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवल्याने आता जि.प.उपाध्यक्षांना नेमके कुठले खाते दिले जाते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता आहे. अडीच वर्षांपूर्वी ठरलेल्या यांच्यातील युतीच्या फार्म्युल्यानुसार अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक २४ जानेवारीला पार पडली. यात अध्यक्षपदी भाजपचे लायकराम भेंडारकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश हर्षे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
हाच फार्म्युला विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत कायम राहणार अशी चर्चा होती; पण १० फेब्रुवारीला पार पडलेल्या विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपने चारही सभापतिपदी भाजपच्याच सदस्यांचे अर्ज भरले; तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला सभापतिपदापासून दूर ठेवल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण या निवडणुकीनंतर भाजपने भंडाऱ्याचा हिशेब गोंदियात चुकता केल्याची चर्चा जि.प.च्या वर्तुळात होती.
आमदार विनोद अग्रवाल भाजपमध्ये परतल्याने त्यांच्या चावी संघटनेचे भाजपमध्ये विलीनीकरण झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपचे संख्याबळ वाढले. भाजपकडे ३२ सदस्यांचे बहुमत असल्याने त्यांना कुणाच्या आधाराची गरज राहिली नाही. त्यामुळे त्यांनी सभापतिपदी भाजपच्या चारही सदस्यांची वर्णी लावली. तर आता खातेवाटपातही राष्ट्रवादी काँग्रेसला कृषी व पशुसंवर्धन खाते दिले जाणार असल्याची चर्चा आहे.
Mahayuti Government : ‘माझी वसुंधरा’ अभियानात १ कोटीचा गैरव्यवहार!
जि.प.च्या एकूण पाच विषय समिती सभापतिपदांपैकी महिला व बालकल्याण सभापतिपदी पौर्णिमा ढेंगे व समाजकल्याण सभापतिपदी रजनी कुंभरे यांची निवड करण्यात आली. तर आता अर्थ व बांधकाम, शिक्षण व आरोग्य आणि कृषी व पशुसंवर्धन सभापतिपदाचे वाटप २४ फेब्रुवारीला होणार आहे. यात अर्थ व बांधकाम सभापतिपदी डॉ. लक्ष्मण भगत, तर शिक्षण व आरोग्य सभापतिपदी दीपा चंद्रिकापुरे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
जि.प.उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन विभाग राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा परिषदेतील जलव्यवस्थापन समितीसह विविध समित्यांमध्ये सदस्यांना घेण्यात येणार आहे. ही निवडसुद्धा जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.