Breaking

Zilla Parishad : कमिशनच्या लोभात औषध खरेदीचा खटाटोप?

 

Drug procurement scam in the name of commission : मुदत संपणाऱ्या औषधांचा आरोग्य केंद्रांना पुरवठा

Wardha जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील औषधी व साहित्य खरेदीतील अनियमितता चौकशीअंती चव्हाट्यावर आली. आरोग्य विभागाच्या औषधी भांडारातून औषधी निर्माण अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मुदत संपणाऱ्या औषधींचा आरोग्य केंद्रांना पुरवठा केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे कमिशनच्या लोभापायीच तर मुदत संपणाऱ्या औषधांची खरेदी केली नसावी, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. यातील सतत्येसोबतच कुणा-कुणाचा सहभाग आहे, हे विभागीय चौकशीअंती पुढे येणारच आहे.

आरोग्य विभागाच्या औषधी भांडारात चाललेली अनागोंदी मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन रहमान यांच्या लक्षात येताच त्यांनी जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात आकस्मिक भेट देऊन दोन्ही औषधी भांडार सील केले होते. तपासणीअंती आरोग्य केंद्रांना अत्यावश्यक औषधांच्या ११ कोटींच्या औषधी व साहित्य खरेदीतील अनियमितता आढळून आली. प्राधान्याने पुरवठा न करणे, मागणी नसतानाही अनावश्यक औषधींचा पुरवठा करणे. त्यातही सहा महिन्यांच्या आतील मुदत संपणारे औषधी दिल्याचे पुढे आले. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी औषधी निर्माण अधिकारी सोज्वळ उघडे यांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निलंबित केले.

Wardha Police : १९ सीसीटीव्ही, हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन!

यावरून औषधी भांडारमध्ये गेल्या वर्षभरात ११ कोटींचे औषधी व साहित्याची खरेदी करण्यात आली. यात मुदत संपणाऱ्या किती औषधांची खरेदी केली. ती खरेदी करीत असताना कोणकोणत्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतली. त्या औषधींचे देयक अदा करण्यासाठी कोणत्या विभागातून फाइल पुढे सरकली व देयक अदा करण्यात आले, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. कारण ही सर्व खरेदी प्रक्रिया एकाकडून होत नसून समितीमार्फत निर्णय घेतला जातो.

औषधींची खरेदी करीत असताना खरेदीच्या दिनांकापासून एक वर्षापेक्षा अधिक मुदत असणारी (साथरोग व महामारी वगळता) औषधी खरेदी करावी लागते. परंतु केवळ कमिशनच्या हव्यासापोटी ही मुदत संपाणारी औषधी खरेदी केल्याचे बोलले जात आहे. सर्वत्रच कमिशनखोरी बोकाळल्याने औषधी खरेदीतही साधारणतः १५ ते २० टक्केपर्यंत कमिशन देण्याचा अलिखित नियम आहे.

Dr. Parinay Fuke : विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी Fixing?

परंतु सहा महिन्यांत मुदत संपत असल्याने ती औषधी खरेदी केल्यास फार्मसिस्टकडून जवळपास ४० ते ५० टक्केपर्यंत कमिशन मिळत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. औषधी भांडारमध्ये गेल्या वर्षभरात कोणकोणत्या फार्मासिस्टकडून औषधींची खरेदी करण्यात आली, याचीही याप्रकरणी यादी तयार करून चौकशी करण्याची गरज आहे.

सहा महिन्यांच्या आत मुदत संपणारी औषधी कोणत्या कंपनीची आहे व कुणाकडून पुरवठा केला. मुदत संपणाऱ्या औषधींचा पुरवठा करण्याचे कारण काय, याचाही शोध घेण्याची गरज आहे. औषधी ही जीवनावश्यक बाब असून हा रुग्णांच्या आरोग्याशी खेळ आहे.