Red alert for these districts, next 24 hours are dangerous : पुढील 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना रेड अलर्ट
Mumbai : महाराष्ट्रात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला असून जवळपास सर्वच जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंबई, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. पुढील 24 तास धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. कोकण व मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. शेतं नदीसारखी दिसू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पुढील तीन दिवस राज्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान विभागाने मंगळवारी देखील राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उद्या कोकणातील काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 50-60 किमीपर्यंत राहील, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. त्यामुळे राज्यावर पाऊस, वादळ आणि विजा असं तिहेरी संकट ओढावलं आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. “गरज असल्यासच घराबाहेर पडा,” असं आवाहन शिंदे यांनी केलं आहे.
दरम्यान, समुद्रातील मच्छिमारांसाठी धोका कायम आहे. मंत्री नितेश राणे यांनी मच्छिमारांना 18 ते 22 ऑगस्टदरम्यान खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. हवामान खात्यानुसार समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी 60 किमी पर्यंत जाऊ शकतो.
Chandrashekhar Bawankule : ईव्हीएमवरून बावनकुळेंचा काँग्रेसला आणखी एक सल्ला !
पावसामुळे राज्यभरात नुकसानाचे वृत्त येत आहेत. मुंबईतील मलबार हिल परिसरात भिंत कोसळून एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. मृत सुरक्षा रक्षकाचे नाव सतीश शिर्के वय 35 असे असून, त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या तिहेरी संकटामुळे पुढील 24 तास धोक्याचे ठरणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून, प्रशासन हायअलर्टवर आहे.
____