Tehsildar Accused of Sitting on Official Chair and Singing : तहसीलदाराच्या खुर्चीवर बसून गाणे म्हणटल्याचा ठेवला होता ठपका
Mumbai : लातूर जिल्ह्यातील रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन शासनाने रद्द केले असून, त्यांना पुन्हा तहसीलदार पदावर रुजू करण्यात आले आहे. यासोबतच त्यांच्यावरील प्रस्तावित विभागीय चौकशीही बंद करण्यात आली आहे. त्यांचे निलंबन अन्यायकारक असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केला होता. त्यासाठी संघटनेने राज्यभर कामबंद चा इशाराही दिला होता. त्यानंतर संघटनेच्या लढ्याला यश आले.
उमरी तहसील कार्यालयातील ८ ऑगस्ट २०२५ रोजीच्या निरोप समारंभात थोरात यांनी तहसीलदारांच्या खुर्चीवर बसून गाणे गायल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे शासनाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत, त्यांना १६ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी निलंबित केले होते. या निर्णयाला १८ ऑगस्ट रोजी शासनाने मान्यता दिली होती.
थोरात यांनी २० ऑगस्ट रोजी निलंबन रद्द करण्याची विनंती शासनाकडे केली होती. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत शासनाने ही विनंती मान्य करत निलंबन मागे घेतले आहे. थोरात यांना भविष्यात कार्यालयीन कामकाजात काळजी घेण्याची ताकीद देण्यात आली असून, ते रेणापूर, जि. लातूर येथील तहसीलदार पदावर लवकरच पूर्ववत रुजू होणार आहेत.
Akola riot case : सुप्रीम कोर्टाचा पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचा आदेश
प्रशांत थोरात यांचे निलंबन मागे घेण्यासाठी संघटनेच्या जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले होते. जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वात सर्व तहसीलदार, नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले होते. ८ ऑगस्ट रोजी उमरी येथून बदली होऊन रेणापूर येथे जाणाऱ्या प्रशांत थोरात यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खुर्चीवर बसून गाणे गायल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले होते.