Rajan Teli demands inquiry as soon as he joins Shinde faction : शिंदे गटात प्रवेश करताच राजन तेलींची चौकशीची मागणी
Mumbai: जिल्हा बँकेतील कथित कर्ज घोटाळ्याने राजकीय वातावरण तापले आहे. नुकताच शिंदे गटात प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांनी मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यावर थेट आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या आरोपांमुळे महायुतीच्या गोटात खळबळ माजली असून, सत्ताधारी युतीत सर्व काही सुरळीत नसल्याचे चित्र समोर येत आहे.
राजन तेली यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. त्यांनी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर दबाव टाकून मनमानी पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अवैध कर्ज वाटप केले. “कामगारांना आठ कोटींपर्यंत कर्जे देण्यात आली, बँकेच्या कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तींनाही लाभ देण्यात आला. या सर्व व्यवहारांमध्ये राजकीय हस्तक्षेप आणि वैयक्तिक फायद्याचे स्पष्ट संकेत आहेत, असा गंभीर आरोप राजन तेली यांनी केला आहे.
RSS Vijayadashami Celebration : एक तासाची नित्य शाखा, हेच संघाचे बलस्थान !
तेली म्हणाले की, “नाबार्ड, सहकार निबंधक आणि स्थानिक पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या, पण कुणीही दखल घेतली नाही. शेवटी मी राज्याचे पोलिस महासंचालकांकडे थेट तक्रार दाखल केली.” त्यांनी पुढे म्हटले की, “या प्रकरणाचा वापर करून मला राजकीयदृष्ट्या अडकवण्याचा प्रयत्न झाला. भू-माफियांपासून ते कर्ज घेणाऱ्या कारखान्यांपर्यंत सगळ्यांची चौकशी व्हायला हवी.”
राजन तेली यांनी पुढे असा दावा केला की, 900 कोटींचे कर्ज कारखान्यांना देण्यात आले असून त्यातील अनेक कारखाने बंद आहेत. या निधीचा गैरवापर झाला आहे का, याची तपासणी केली पाहिजे.
दरम्यान, राजन तेलींचा हा आरोप केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरता मर्यादित नसून, तो राजकीय पातळीवरही महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. कारण अलीकडेच त्यांनी उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला.
राजन तेली पूर्वी भाजपमध्ये होते, मात्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाकडून सावंतवाडी मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर ते त्या पक्षात गेले. दीपक केसरकर यांच्या विरोधात त्यांनी तेव्हा निवडणूक लढवली, पण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काही काळ ते शांत होते. मात्र आता शिंदे शिवसेनेत दाखल झाल्यानंतर त्यांनीच पुन्हा महायुतीच्या मंत्र्यावर बोट ठेवत आरोप केल्याने तळकोकणातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
cough syrup : बालकांच्या आरोग्यासाठी सतर्कता ‘त्या’ औषधावर बंदी
या घडामोडीनंतर महायुतीत अंतर्गत तणाव उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता नितेश राणे आणि राजन तेली यांच्यातील हा संघर्ष पुढे कोणत्या दिशेने जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.