Railway network expanded 18 districts four projects worth Rs 24,634 crore : २४,६३४ कोटींच्या चार प्रकल्पांमुळे १८ जिल्ह्यांत रेल्वे जाळ्याचा विस्तार
New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे मंत्रालयाच्या चार महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांवर एकूण २४,६३४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांतील रेल्वे नेटवर्कच्या विस्ताराला मोठी चालना मिळणार आहे.
या मंजूर प्रकल्पांमध्ये वर्धा-भुसावळ तिसरी आणि चौथी लाईन (३१४ किमी) तसेच गोंदिया-डोंगरगड चौथी लाईन या दोन महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. या नवीन मार्गांमुळे मध्य भारतातील रेल्वे वाहतुकीत वेग, क्षमता आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
Shivsena protest : तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याचे वावडे का?, शिवसेनेचा सवाल
केंद्रीय समितीने मंजूर केलेल्या चारही प्रकल्पांमुळे १८ जिल्ह्यांत एकूण ८९४ किमी रेल्वे जाळ्याचा विस्तार होईल. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांतील नागरिकांना याचा थेट फायदा मिळणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, या प्रकल्पांमुळे कोळसा, पोलाद, सिमेंट, अन्नधान्य, फ्लायॲश आणि कंटेनर वाहतुकीत मोठी वाढ होईल. त्यामुळे उद्योगांना वेगवान मालवाहतुकीची सुविधा मिळून आर्थिक विकासालाही गती मिळेल.
या प्रकल्पांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरक दृष्टीकोन. या मार्गांमुळे दरवर्षी सुमारे २८ कोटी लिटर इंधनाची बचत होणार असून, ३९ कोटी किलो कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट होईल — जे सुमारे ६ कोटी झाडे लावण्याइतके परिणामकारक ठरेल.
या चार रेल्वे प्रकल्पांमुळे एकूण ३,६३३ गावे थेट रेल्वे संपर्कात येतील. या भागांमध्ये सुमारे ८५.८४ लाख लोकसंख्या राहते. या मार्गांमुळे विदिशा, राजनांदगाव यांसारखे जिल्हे तसेच सांची, सातपुडा व्याघ्र प्रकल्प, भीमबेटका शैलाश्रय आणि नवागाव राष्ट्रीय उद्यान अशा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना जोडणी मिळेल.
Farmers suicide : “नव नगराची अधिसूचना काढा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या!”
या मंजुरीमुळे मध्य आणि पश्चिम भारतातील रेल्वे जाळ्याचा विकासाचा वेग लक्षणीयरीत्या वाढेल, तसेच उद्योग, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीलाही नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.