Strange gang of thieves, Targeted only weddings : मध्य प्रदेशातील साँसी गँग अकोला पोलिसांच्या ताब्यात
Akola स्थानिक गुन्हे शाखेने राजगढ, मध्यप्रदेश येथून साँसी गँग कडून एकूण ५,९१,००० रुपयांचा चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. हॉटेल VS, बाळापूर नाका, अकोला येथे लग्न समारंभात झालेल्या चोरीसह अन्य दोन गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
या प्रकरणी अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले. १२ दिवस मध्यप्रदेशात तपास करून पोलिसांनी अखेर आरोपींचा शोध घेत मुद्देमाल हस्तगत केला.
दि. ३० जानेवारी २०२५ रोजी हॉटेल VS, बाळापूर नाका, अकोला येथे एका लग्न समारंभात अज्ञात चोरट्याने नवरीला आलेल्या भेटवस्तूंची बॅग लंपास केली. या बॅगेत ₹५ लाख रोख, सोन्याची १५ ग्रॅमची चेन, ४ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या आणि ऍपल कंपनीचा मोबाईल होता. फिर्यादी विशाल अशोककुमार पंजवानी (रा. सिंधी कॅम्प, अकोला) यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंदविला होता.
गुन्हा १:
फिर्यादी राजेश उर्फ भारकर बाबाराव सावरकर (रा. कावसा, ता. अकोट, जि. अकोला) हे बँकेत ₹३ लाख जमा करण्यासाठी जात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पाठीवर टोमॅटो केचअप टाकून लक्ष विचलित केले व पैशांची बॅग चोरून नेली. याबाबत अकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
Akola police : अकोला जिल्हा पोलीस सीसीटीएनएस रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर
गुन्हा २:
फिर्यादी अब्दुल सादीक अब्दुल समद (रा. अकोट फैल, अकोला) हे पेंशनचे पैसे बँकेत भरण्यासाठी जात असताना अज्ञात आरोपीने पाठलाग करून त्यांच्या गाडीला लटकून ₹४१,००० रोख असलेली थैली हिसकावून नेली. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्यांचा तपास करत तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा माग काढला. तिन्ही गुन्ह्यांमध्ये राजगढ, मध्यप्रदेश येथील कडिया साँसी टोळीचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले.
संशयित आरोपी गावातून फरार झाले होते. मात्र, पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे त्यांच्या घराची झडती घेत एकूण ₹५,९१,००० रोकड जप्त केली.
ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक शंकर शेळके (स्थानिक गुन्हे शाखा, अकोला) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.