Workers’ protest against new labor codes : कामगारांचा संताप; सीटूच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Buldhana केंद्र सरकारने मंजूर केलेल्या चार नव्या श्रमसंहितांमुळे कामगारांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करीत सीटू (CITU) च्या नेतृत्वाखाली हजारो अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
या आंदोलनाचे नेतृत्व करताना सीटूचे Centre of Indian Trade Unions जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांनी मोदी सरकारवर थेट हल्ला चढवला. “कामगारांनी शंभर वर्षांच्या संघर्षातून मिळवलेले ४४ कामगार कायदे मोडीत काढून सरकार भांडवलदारधार्जिण्या नव्या श्रमसंहितांद्वारे कामगारांना गुलाम बनवण्याचा डाव रचत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
NCP : राष्ट्रवादी म्हणते, ‘लोक सिग्नल पाळत नसतील तर काढून फेका’
गायकवाड पुढे म्हणाले, “या श्रमसंहितेमुळे किमान वेतन, कर्मचाऱ्यांचा दर्जा, पेन्शन, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युएटी व आरोग्य विम्यासारख्या मूलभूत सुविधा धोक्यात आल्या आहेत. मुठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी केंद्र सरकार हे सगळं करीत आहे.”
तेवढ्यावरच न थांबता, त्यांनी राज्य सरकारवरही टीकास्त्र सोडले. “लोकशाही अधिकारांची गळचेपी करणाऱ्या ‘विशेष जनसुरक्षा विधेयक’ाच्या नावाखाली राज्य शासनाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याची तयारी सुरू केली आहे. हा कायदा बहुमताच्या जोरावर लादण्याचा कट कामगारविरोधी आहे,” असा आरोप करत त्यांनी कामगार संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
Raj Thackeray : राज ठाकरे यांचं एक ‘ ट्विट’, आणि ‘ सस्पेन्स’ वाढला
जिजामाता प्रेक्षागृह येथून सुरू झालेल्या मोर्चात विविध कामगार गटांनी “श्रमसंहिता रद्द करा”, “जनसुरक्षा विधेयक मागे घ्या”, “शासकीय दर्जा द्या”, “किमान वेतन लागू करा”, “पेन्शन-ग्रॅज्युएटी लागू करा”, “समान कामाला समान वेतन द्या” अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून टाकला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. पाटील यांना देण्यात आले.