Election Commissions response to Rahul Gandhis allegations : राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोगाचे उत्तर
New Delhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या अलंद मतदारसंघात झालेल्या मतदारयादीतील घोटाळ्याचा आरोप करत निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला होता. मात्र, आयोगाने त्यांच्या सर्व आरोपांना फेटाळून लावत ते निराधार असल्याचे स्पष्ट केले.
राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन, “६,०१८ मतदारांची नावे सॉफ्टवेअर आणि राज्याबाहेरील फोन नंबरच्या मदतीने डिलीट करण्यात आली. ही मोहीम काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांमध्ये राबवली गेली,” असा गंभीर दावा केला. त्यांनी याचे पुरावे दाखवत आयोगाच्या प्रमुखांवरही थेट आरोप केले.
OBC Reservation : उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली, उपचार घेण्यास दिला नकार
यानंतर निवडणूक आयोगाने एक्सवर प्रतिक्रिया देत म्हटले, “कोणत्याही मतदाराचे नाव ऑनलाइन वगळणे शक्यच नाही. अधिकाऱ्यांच्या पडताळणीशिवाय आणि संबंधित मतदाराला आपली बाजू मांडण्याची संधी न देता नाव वगळले जाऊ शकत नाही. त्यामुळे राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार आहेत.”
तथापि, आयोगाने हे मान्य केले की अलंद मतदारसंघात मतदारांची नावे वगळण्याचे काही प्रयत्न झाले होते. मात्र, हे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि त्याबाबत आयोगाने स्वतः एफआयआर नोंदवला आहे. अधिक चौकशी सुरू असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले.
आयोगाच्या आकडेवारीनुसार, अलंद मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार बी.आर. पाटील यांनी दहा हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे मतदारांची नावे वगळण्याच्या कथित प्रयत्नांमुळे निकालावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट झाले.
____








